मालगुंड एज्युकेशन सोसायटी, मालगुंड
मालगुंड एज्युकेशन सोसायटी गेली ८३ वर्षे प्रसिद्ध कवी 'केशवसुत' यांचे जन्मस्थान मालगुंड आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र 'गणपतीपुळे' जवळील मालगुंड या पवित्र गावात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट आणि काळजीपूर्वक कार्य करत आहे.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीची स्थापना १० ऑक्टोबर १९४० रोजी 'विजया दशमी'च्या शुभ मुहूर्तावर झाली. त्याकाळी मालगुंड परिसरात तसेच जयगड, सैतवडे, वरवडे, काळझोंडी, निवेंडी, गणपतीपुळे, नेवरे अशा सुमारे १० ते १५ गावांमध्ये माध्यमिक शालेय शिक्षणाची गैरसोय होती.
रत्नागिरीला माध्यमिक शिक्षणासाठी फक्त श्रीमंत मुलेच जाऊ शकत होती. शेतकऱ्यांच्या मुलांना आणि गरीब कुटुंबातील मुलांना माध्यमिक शिक्षण घेता आले नाही. त्यावेळी काही प्रतिष्ठित व्यक्ती पुढे आल्या आणि त्यांनी माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 'न्यू इंग्लिश स्कूल'ची स्थापना झाली. श्री. गोविंद विठ्ठल पटवर्धन यांनी शाळेचे पहिले शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यावेळी संस्थापक श्री. विठ्ठल केरो मेहेंदळे यांनी सोसायटीच्या विद्यालयासाठी २ एकर जागा दिली. पुढील काळात श्री. बळीराम भिकाजी परकर यांनी रु. 5000/- (रु. पाच हजार) देणगी दिली आणि न्यू इंग्लिश स्कूलचे नामकरण 'बळीराम परकर विद्यालय ' असे करण्यात आले.
आजूबाजूच्या जवळपास 10 ते 15 गावांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी रत्नागिरीला जावे लागत होते. सोसायटीने मालगुंड येथे जून १९८२ पासून तत्कालीन अध्यक्ष श्री. शिंदे गुरुजी, उपाध्यक्ष श्री. भाईसाहेब मयेकर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सदानंद परकर यांच्या प्रयत्नांनी मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज ची स्थापन झाली व मालगुंड परिसरातील गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळाली.